पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारीत अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी
१ एप्रिलपासून अर्थसंकल्प अंमलात येणार
पिंपरी, ता. २४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२६-२७ चा ९ हजार ३२२ कोटी रुपयांचा सुधारीत अर्थसंकल्प स्थायी समितीच्या उपसूचनांसह स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंगळवारी (ता. २४) सादर केला. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. नवीन आर्थिक वर्ष अर्थात १ एप्रिलपासून अर्थसंकल्प अंमलात येईल.
प्रारंभी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा महापाौर रवी लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर सभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला. स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे यांनी अर्थसंकल्प सभेपुढे सादर केला.
बारणे म्हणाले, ''महापालिका प्रशासनाने ९ हजार ३२२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. उपसूचनांसह स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजूरी दिली आहे. रु.९३२२.१७ कोटीच्या अंदाजपत्रकात जुन्या कामांसाठी जुन्या कामांसाठी १३०० कोटी इतकी तरतूद महापालिकेने केली आहे. तर नवीन कामांसाठी २०० कोटी इतकी तरतूद आहे. त्यामध्ये रुपये ४१४.२२ कोटीची वाढ करून स्थायी समितीमार्फत महापालिका सभेकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले आहे. सन २०२६-२७ मध्ये ५ हजार ६६०.७३ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. ५ हजार ६५५.७३ कोटी रुपयांचा खर्च होऊन मार्च २०२७ अखेरीस ५ कोटी रुपये रक्कम शिल्लक राहील असा अंदाज आहे. ''
''उपसूचनांमध्ये प्रामुख्याने बांधकाम परवानगी विभागात रु. 258. 25 कोटीची वाढ सुचविण्यात आली आहे. सन 2025 - 26 मध्ये बंद असलेली शासकीय मोजणी पुहा सुरु झाली आली आहे. तसेच, पर्यावरण समितीने बंद केलेले ना हरकत दाखले पुन्हा सुरु करण्यात आल्याने महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प व बिगर निवासी प्रकल्प चालू व पूर्णत्वास होत असल्याने बांधकाम परवानगी विभागाच्या उत्पन्नात रु.२५८.०० कोटीपेक्षा अधिकची वाढ होणार आहे. ''
''कर संकलन विभागात मालमत्तांची अ, ब व क अशी विभागणी आहे. शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याने त्याची वर्गवारी अ आणि ब केल्याने मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच, नवीन गृहप्रकल्प उभारणी होत असल्याने नवीन मिळकतींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ही मालमत्ता करात ५०.०० कोटी हून अधिक उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर, आकाश चिन्ह परवाना विभागामार्फत होर्डिंग परवानगी दिली जाते. शहरात सन 2018 पासून R1, R2, R3, R4 असे झोन आहेत. शहराचा विकास लक्षात घेवून त्याचे R1, R2 असे फक्त दोन झोन केल्याने महानगरपालिकेस 34 कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते. ''
बारणे पुढे म्हणाले, ''शहरात मोठे गृहप्रकल्प व बिगर निवासी प्रकल्प उभारले जात आहेत, या प्रकल्पांना पाणीपुरवठा तसेच थकबाकी वसुली कामी पाठपुरावा केल्याने मनपाच्या पाणीपट्टीत 20 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. भूमी जिंदगी विभागाकडील रिकामे गाळे/ मोकळ्या जागा यांचे नियोजन करून भाडे तत्त्वावर दिल्याने महापालिकेच्या उत्पन्नात 4 कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते.
पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता २००.०० मी. बी.आर.टी कॉरीडॉरमध्ये मोठया प्रमाणात विकसनाचे काम प्रगतीपथावर असुन त्यापासुन मनपास र.रु.४०.०० कोटी इतकी रक्कम यु.टी.एफ. निधीत वाढु शकते. त्यातुन बी.आर.टी. साठी र.रु.२०.०० कोटी व इतर उड्डाणपुल ग्रेडसेपरेटर प्रकल्पासाठी र.रु.२०.०० कोटी इतक्या रक्कमेची कामे केली जाणार आहेत. '' असे बारणे यांनी सांगितले.
महापौर लांडगे पीठासन अधिकारी होते. सर्वसाधारण सभेतील चर्चेनंतर अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्पातील तरतूदी -
- नवीन कामांसाठी -२०० कोटी रुपये
- वाढीव नवीन कामांसाठी - ४१४ कोटी रुपये
- सन्माननीय नगरसदस्यांनी सुचवलेल्या नवीन कामांसाठी १९६.९० कोटी रुपये
- पवना धरणातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेक्टर क्र. २३, निगडी जलशुद्धीकरण केंद्र पर्यन्त थेट समांतर जलवाहिनी टाकणे -- ४० कोटी रुपये
- माता रमाई स्मारक - १.१५ कोटी रुपये
- महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण व सक्षमीकरण प्रशिक्षण केंद्र उभारणे - ५ कोटी रुपये
- महानगरपालिकेची डिजिटल स्कूल उभारणे - २ कोटी रुपये
- पद्मभूषण रतन टाटा म्यूजियम गॅलरी - २ कोटी रुपये
- महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डीस्पोजल मशीन - २ कोटी रुपये
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात लोकनेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुतळा व स्मारक उभारणे (अजित सृष्टि) - ५ कोटी रुपये
- शहरात विचार विनिमय कलाकार कट्टा तयार करणे - २ कोटी रुपये
- स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आरोग्य सेवा हेल्पलाईन विकसित व मदत कक्ष करणे - ३ कोटी रुपये
- प- अंदाज पत्रक - अनुसूचित जाती जमातीतील प्रभागांसाठी - २३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- भटक्या श्वानांसाठी निवारा / शेल्टर - ६ कोटी रुपये
- मनपा क्षेत्रीय कार्यालय, क्रीडासंकुल, नाट्यगृह, शाळांमध्ये व मनपाच्या सर्व इमारतींवर सोलर पॅनल बसविणे - ५ कोटी रुपये
- शहरात कामगार कट्टा उभारणे - ४ कोटी रुपये
- मनपा हद्दीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यामधील पावसाळी लाईनमध्ये व सखल भागात रेन वॉटर हारवेस्टिंग सिस्टम करणे - ५ कोटी रुपये
- महिलांसाठी ब्रेस्ट कन्सर मेमोग्राफी मशीन उपलब्ध करणे - १ कोटी रुपये
- बेघरांसाठी घर, निवारा किंवा शेल्टर उपलब्ध करून देणे - १ कोटी रुपये
- होकर्स झोन निर्माण करणे - १ कोटी रुपये
- पार्किंग पॉलिसी पे अँड पार्क - १ कोटी रुपये
- केजूबाई बंधारा दर्जा वाढविण्यासाठी जलक्रीडा पर्यटन निर्माण करणे - ४ कोटी रुपये
- शहरातील प्रमुख रस्ते सिग्नलमुक्त करण्यासाठी वाहतूक विषयक कामे - १ कोटी रुपये
- शहरात ठिकठिकाणी हिरवळ व वृक्षारोपण करुन ऑक्सिजन पार्क तयार करणे - २ कोटी रुपये
- नवीन प्रशासकीय मनपा इमारतीसाठी फर्निचर विषयक कामे व उर्वरित स्थापत्य, विद्युत विषयक कामे करणे - ५ कोटी रुपये
- पवना रिवर फ्रंट - १५ कोटी रुपये
- शहरात मलनिस्सारण सुधारणा करणे - २० कोटी रुपये
- EV चार्जिंग पॉइंट निर्माण करणे - १.५ कोटी रुपये
- मनपा नगरसेवकाच्या प्रभागातील विकास कामांसाठी प्रत्येकी १० लाख विकासनिधी उपलब्ध करून देणे
१३ कोटी रुपये