पिंपरी-चिंचवड | २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे (वय ५७ वर्षे) यांच्याविरोधात ४५ हजार ७८५ रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी निविदा रकमेच्या ०.५ टक्के लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५७ वर्षीय तक्रारदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल, दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याच्या एकूण ९१ लाख ५७ हजार ६८ रुपये किमतीच्या पाच निविदा घेतल्या होत्या.
या पाचही कामांच्या वर्क ऑर्डर मिळवण्यासाठी महापालिकेसोबत करारनामे करणे आवश्यक होते. तक्रारदाराने संबंधित करारनामे तयार करून कंपन्यांच्या वतीने सह्या केल्या आणि अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्या सह्यांसाठी फाइल महापालिकेकडे सादर केली होती.
तक्रारीनुसार, अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी पाचपैकी तीन निविदांच्या फाइलवर सह्या करून त्या मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे पाठवल्या.
फाइल अनेक दिवस प्रलंबित असल्याने तक्रारदाराने २९ मे २०२६ रोजी प्रमोद ओंभासे यांची भेट घेतली. त्यावेळी ओंभासे यांनीही पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपये मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या संदर्भात तक्रारदाराने ११ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान ओंभासे यांनी त्यांच्या टेबलवर असलेल्या ३८ लाख रुपयांच्या तीन निविदांच्या फाइलसाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वीही तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे त्यांनी मान्य केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
या प्रकरणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद ओंभासे यांना दुपारी ३ वाजता तपासासाठी ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ यांच्या पथकाने केली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी पर्यवेक्षण केले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.