पिंपरी-चिंचवड | २९ ऑक्टोबर २०२६ : खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञानाची आवड असणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अॅस्ट्रोफेस्ट २०२६ – आकाशवेध २०२६’ या वैशिष्ट्यपूर्ण खगोलशास्त्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे हा महोत्सव होणार असून, नागरिकांना विज्ञान आणि अवकाशविश्वाशी संबंधित विविध उपक्रमांचा अनुभव घेता येणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण यांच्या वतीने करण्यात आले आहे. खगोलशास्त्र आणि विज्ञान क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रसिद्ध असलेले पद्मविभूषण प्रा. डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांच्या स्मृतींना हा महोत्सव समर्पित करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्रातील संशोधनाबरोबरच सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रेरणा घेत खगोलशास्त्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल निर्माण करणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
IUCAA, ज्योतिर्विद्या परिसंस्था (JVP), NCRA-TIFR आणि LIGO-India यांच्या सहकार्याने तसेच BRICS खगोलशास्त्र कार्यगटाच्या अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात विशेष खगोल प्रदर्शन, आकाशदर्शन, तारांगण शो, खगोल व्याख्याने, प्रश्नमंजुषा, स्पर्धा, सर्जनशील कार्यक्रम, विज्ञान प्रात्यक्षिके, खगोल-छायाचित्रण आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना खगोलशास्त्राची ओळख करून देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून अवकाशविश्वातील घडामोडी आणि वैज्ञानिक संकल्पना जाणून घेण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
महोत्सवाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. हा महोत्सव पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क व तारांगण, ऑटो क्लस्टरजवळ, पुणे – ४११०१९ येथे होणार आहे.
या खगोलशास्त्र महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण यांच्या वतीने करण्यात आले आहे.