नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू, मात्र मनुष्यबळ आणि संसाधनांचा पत्ता नाही!

नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू, मात्र मनुष्यबळ आणि संसाधनांचा पत्ता नाही!

पिंपरी-चिंचवड | २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू केली असली, तरी आवश्यक मनुष्यबळ, कचरा संकलन वाहने आणि स्वच्छतेची यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा भाजप नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी उपस्थित केला आहे. रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता व्यवस्थेबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

कलाटे यांच्या निवेदनानुसार, मोशी येथील कचरा डेपोतील दुर्घटनेला जवळपास तीन महिने उलटूनही संबंधित क्षेत्रातील कचरा संकलन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. कचरा खाली करण्यासाठी वाहनांना चार ते पाच तास लागत असल्याने संकलनाच्या फेऱ्या कमी होत आहेत. ठेकेदारांकडून आवश्यक वाहने वेळेत उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक १६, २५ आणि २६ यांचा समावेश असून, या क्षेत्राची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक असल्याचे कलाटे यांनी नमूद केले आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी या वेगाने विकसित होणाऱ्या भागांचा यात समावेश आहे.

अपुऱ्या वाहनांमुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधून नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कचरा साचणे आणि दुर्गंधी पसरणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नवीन कार्यालये सुरू करून उपयोग काय, जर त्यांना आवश्यक साधनेच उपलब्ध नसतील? असा सवाल उपस्थित करत कलाटे यांनी क्षेत्रीय कार्यालये केवळ प्रशासकीय रचना न राहता नागरिकांना प्रभावी सेवा देणारी यंत्रणा बनली पाहिजेत, अशी भूमिका मांडली.

संबंधित कार्यालयांना पुरेशा घंटागाड्या, कचरा संकलन वाहने, स्वच्छता कर्मचारी आणि जेटिंग मशीन उपलब्ध करून द्यावीत. वाहनांच्या फेऱ्या वाढवाव्यात, मेकॅनिकल स्वीपिंगद्वारे स्वच्छता प्रभावीपणे राबवावी आणि ठेकेदारांच्या कामकाजाची नियमित तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची (STP) क्षमता अपुरी असल्याचे कलाटे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. प्रक्रिया न केलेले मैलामिश्रित सांडपाणी नाले आणि नैसर्गिक जलप्रवाहांमध्ये सोडले जात असल्याची समस्याही त्यांनी मांडली.

त्यामुळे पुरेशा क्षमतेचे नवीन एसटीपी प्रकल्प उभारावेत, अस्तित्वातील प्रकल्पांची क्षमता वाढवावी आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलप्रवाहांमध्ये सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories