रावेतमध्ये मोबाईल हॅक करून ९.९३ लाखांची फसवणूक

रावेतमध्ये मोबाईल हॅक करून ९.९३ लाखांची फसवणूक

रावेत | २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात मोबाईल हॅक करून ९ लाख ९३ हजार ३०५ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पेट्रोल पंपावर गुगल पेच्या माध्यमातून पैसे भरल्यानंतर मोबाईल गरम होऊन बंद पडला. त्यानंतर खात्यातील मोठी रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार एका नागरिकाने केली आहे. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी कांताराम कृष्णा काशीद (वय ४७ वर्षे,  रावेत, ता. हवेली, जि. पुणे; मूळ  मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, काशीद हे दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी संभाजी चौक येथील पेट्रोल पंपावर गेले होते. त्यांनी २६५ रुपयांचे पेट्रोल भरल्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून पैसे दिले.

त्यानंतर ते भेळ चौक, निगडी येथे जात असताना त्यांचा मोबाईल गरम होऊ लागला. मोबाईल काढून पाहिला असता स्क्रीनवर काहीही दिसत नव्हते.

सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मोबाईल पुन्हा सुरू झाला. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता शर्मा हॉटेलमध्ये चहा पिऊन ६० रुपयांचे बिल ऑनलाइन भरताना व्यवहार अयशस्वी झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे काशीद यांनी चहाचे बिल रोख स्वरूपात भरले. घरी गेल्यानंतर त्यांनी मोबाईलमधील गुगल पे ॲपवर खात्यातील शिल्लक तपासली असता ९ लाख ९३ हजार ३०५ रुपये कमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अज्ञात व्यक्तीने मोबाईल हॅक करून कोणतीही परवानगी किंवा ओटीपी न घेता ही रक्कम काढून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप काशीद यांनी फिर्यादीत केला आहे.

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories