संदीप वाघेरे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर दावा

संदीप वाघेरे यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर दावा

पिंपरी-चिंचवड | २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) मशीन खरेदी निविदेत कथित भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केल्यानंतर आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा गंभीर दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पुष्पराज शेषाद्री गोवर्धन आणि त्यांचे पुत्र ययाती गोवर्धन यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे तक्रार करून कायदेशीर कारवाई आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

वाघेरे यांच्या तक्रारीनुसार, वायसीएम रुग्णालयासाठी मशीन खरेदी करण्याकरिता महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेत मशीनच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा जाणीवपूर्वक वाढीव रक्कम दाखविण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही संबंधित कागदपत्रांसह तक्रार केल्याचे वाघेरे यांनी म्हटले आहे.

निविदेतील कथित गैरव्यवहाराबाबत आवाज उठवल्यानंतर संबंधित कंपनीचे मालक पुष्पराज शेषाद्री गोवर्धन यांनी कार्यालयात येऊन आपली भेट घेतल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे. या प्रकरणात लक्ष घालू नये आणि विषय पुढे वाढवू नये, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

तसेच, काळेवाडी परिसरातील काही गुंडांकडून आपला बंदोबस्त करण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. पुष्पराज गोवर्धन आणि ययाती गोवर्धन यांनी स्थानिक गुंडांच्या माध्यमातून आपल्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप वाघेरे यांनी तक्रारीत केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

यापूर्वीही धमक्या मिळाल्याबाबत तक्रारी केल्या होत्या; मात्र अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा दावा वाघेरे यांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींविरोधातील धमकी, कथित कटकारस्थान आणि सुपारी दिल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, आवश्यक असल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि आपल्या जीविताच्या सुरक्षेसाठी तातडीने पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, हे सर्व आरोप नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या तक्रारीवर आधारित आहेत. तसेच या तक्रारीवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, याचीही पुष्टी झालेली नाही.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories