हिंजवडी | २९ ऑक्टोबर २०२६ : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवण्याच्या आमिषाने मारुंजी परिसरातील एका शिक्षकाची १६ लाख २४ हजार ६०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात सायबर चोरट्याने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडून ट्रेडिंग ॲप डाउनलोड करण्यास सांगितले आणि शेअर्स खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.
या प्रकरणी लवकुश शिवबली सिंह (वय ४९ वर्षे, व्यवसाय शिक्षक, मूळगाव ४०३ लहटी साईड, मारुंजी मुंबवा रोड, पुणे; सध्या रा. १०१ प्लस फार्म सोसायटी, महाराजा हॉटेलजवळ, मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत त्यांना ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले.
या माध्यमातून ऑनलाइन शेअर्स खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. संबंधित व्यक्तीच्या सांगण्यावरून फिर्यादीने पंजाब नॅशनल बँकेच्या दोन खात्यांमधून एकूण १६ लाख २४ हजार ६०० रुपये अज्ञात आरोपीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये पाठवले.
मात्र, ही रक्कम शेअर्स खरेदीच्या नावाखाली स्वीकारून आपली आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून १२ मिनिटांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (सुधारित) कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस गुन्हे पथक करीत आहे.