पिंपरी-चिंचवड जिल्हा थाई बॉक्सिंगतर्फे राज्य स्तरीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात
पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा निवड चाचणीसाठी पिंपरी चिंचवड जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा येथे २४ ते २६ जुलै पर्यंत आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील एकूण 425 खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेतील 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' हा बहुमान पिंपरी-चिंचवड शहराने पटकावला. सांघिक गटात मुंबईने प्रथम, सातारा जिल्ह्याने द्वितीय, तर सांगली जिल्ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. गोंदिया जिल्ह्याला 'शिस्तबद्ध संघ' म्हणून गौरविण्यात आले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी व पदके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष पी. वाय. आत्तार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली, तसेच महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अजय खेडगरकर, कार्याध्यक्ष विशाल माळी , टेक्निकल डायरेक्टर वजीर शेख, पुणे विभागप्रमुख अमोल माने, मुंबई विभाग प्रमुख हरिओम चव्हाण, नागपूर विभागप्रमुख सलीम शेख, नाशिक विभाग प्रमुख राज कांबळे, कोल्हापूर विभागप्रमुख रविराज गाढवे, राष्ट्रीय संघटनेच्या महिला कोच प्रियंका अचमट्टी व शुभांगी सहारे यांची उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पंचांचा सन्मान करण्यात आला, स्पर्धेत उत्कृष्ट पंच म्हणून निशांन चौधरी यांनी कामगिरी केली. स्पर्धेचे आयोजक नाजिम शेख गणेश मांढरे व अभिषेक शिंदे यांनी उत्कृष्ट आयोजन करत राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केली,स्पर्धेत प्रभावी व आकर्षक सूत्रसंचालन कोल्हापूर विभाग प्रमुख रविराज गाढवे सर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड थाई बॉक्सिंग असोसिएशन यांनी मोलाचे सहकार्य केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची दिनांक ६, ७ व ८ सप्टेंबर २०२६ रोजी छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रशिक्षक, पंच, क्रीडा मार्गदर्शक, शाळांचे प्रतिनिधी, आयोजक व स्वयंसेवक यांनी समाधान व्यक्त करत सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.