पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 'बायोमेट्रिक उपस्थिती' अनिवार्य

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 'बायोमेट्रिक उपस्थिती' अनिवार्य

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 'बायोमेट्रिक उपस्थिती' अनिवार्य, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती

हजेरी असेल तरच कंत्राटदारांना मिळणार बिले

पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आता कडक धोरण अवलंबले जाणार असून, ठेकेदारांमार्फत सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी 'थंब रीडिंग' (बायोमेट्रिक हजेरी) अनिवार्य करण्यात येणार आहे. यापुढे ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाईल, त्यांच्याच कामाची बिले कंत्राटदारांना अदा केली जातील, असा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आणि कंत्राटदारांच्या देयकांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. महापालिकेच्या उद्यान विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग, सुरक्षा विभाग आणि विविध तांत्रिक सल्लागार विभागांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा प्रत्यक्ष कामगार कामावर हजर नसतानाही त्यांची कागदोपत्री हजेरी लावून बिले उचलली जात असल्याच्या तक्रारी सदस्यांनी बैठकीत केल्या होत्या. सदस्यांच्या या रास्त मागणीची दखल घेत सभापती अभिषेक बारणे यांनी आता बायोमेट्रिक हजेरीशिवाय बिले मंजूर न करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

या निर्णयाबाबत बोलताना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, "महापालिकेच्या कामात पारदर्शकता आणणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. महापालिकेच्या तिजोरीतून होणारा खर्च हा करदात्यांचा आहे, त्यामुळे त्यात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. मग तो उद्यान विभाग असो, आरोग्य, वैद्यकीय, सुरक्षा विभाग असो किंवा सल्लागार कर्मचारी असोत, सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच मोजली जाईल. केवळ बायोमेट्रिक नोंद असलेल्या कामाचेच मोजमाप केले जाईल आणि त्यानुसारच कंत्राटदारांची बिले अदा केली जातील. या निर्णयामुळे कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित होईल आणि बोगस हजेरीला पूर्णपणे आळा बसेल."

या निर्णयामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात शिस्त येणार असून, कंत्राटदारांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी बायोमेट्रिक प्रणालीमध्ये त्वरित पूर्ण करावी, असे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories