'पोलिस आयुक्तांची भेट' उपक्रमाच्या वेळेत बदल, सोमवार ऐवजी शुक्रवारी होणार भेट
पिंपरी, ता. २० - नागरिक आणि पोलिस यांच्यातील संवाद वाढवणारा 'पोलिस आयुक्तांची भेट' या उपक्रमाच्या दिवस आणि वेळेत प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आला आहे. हा उपक्रम आता दर सोमवारी न होता दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत होणार आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविला जातो. यात नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना ऐकून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली जाते. हा उपक्रम यापूर्वी दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत आयोजित केला जात होता.
मात्र, येत्या आठवड्यापासून त्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवार २२ जून रोजी हा उपक्रम होणार नाही. त्याऐवजी शुक्रवारी २६ जूनला सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत नागरिकांना पोलिस आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेता येणार आहे. त्यानंतर हा उपक्रम नियमितपणे दर शुक्रवारी याच वेळेत आयोजित करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.