पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरीत एसपी मॉलजवळील परिसरात जुन्या खटल्याच्या खर्चाबाबत बोलणी सुरू असताना झालेल्या वादतून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या वादात एक तरुण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी संततुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० च्या सुमारास एसपी मॉलच्या प्रवेशद्वारासमोरील महिंद्रा अँथिया सोसायटीजवळ ही घटना घडली. अशिष वामन जाधव (वय ३१, रा. काळेवाडी) याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे.
आशिष डिलिव्हरीचे काम करतो. जुन्या प्रकरणात वकिलांची फी देण्याबाबत त्याने दोघांशी बोलणी केली. त्यावरून झालेल्या वादात त्याला मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, लोखंडी पाइपने डोक्याला मार लागल्याने आशिष गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी मॉन्टी ऊर्फ सॅलमन गायकवाड (अंदाजे वय ३०) आणि माऊली उनवने (अंदाजे वय २७, दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. संततुकाराम नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.