शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार

शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार

शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार

पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या 'शून्य कचरा (झिरो वेस्ट स्लम)' उपक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गट यांना 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार आसरा सोशल फाऊंडेशन, पुणे आणि ओम पब्लिकेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित 'उत्कर्ष भारत सन्मान सोहळा – २०२६' या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी बचत गटाला अभिनेते विजय गोखले व प्रसिद्ध साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर तसेच अश्विनी चौधरी यांनी हा सन्मान स्विकारला. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्टी भागांमध्ये स्वच्छता, कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा संकलित करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रणाला चालना देणे तसेच परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी 'शून्य कचरा झोपडपट्टी' या प्रकल्पास १६ ऑगस्ट २०२२ रोजी सुरूवात झाली. हा प्रकल्प देशातील पहिला शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प असून यामध्ये स्थानिक महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे. त्यांच्यामार्फत घराघरांत जनजागृती, कचरा वर्गीकरण, संकलन आणि परिसरातील स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

या प्रकल्पाची सुरुवात गवळीमाथा झोपडपट्टी परिसरात करण्यात आली होती. या ठिकाणी श्रीकृष्ण महिला बचत गटाने अत्यंत जबाबदारीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. घराघरांत जाऊन कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती, नियमित कचरा संकलन, स्वच्छता राखणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे या कामांमध्ये बचत गटाने उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे या उपक्रमाला यश मिळाले असून इतर झोपडपट्टी भागांसाठीही हा प्रकल्प प्रेरणादायी ठरला आहे.

महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्याची दखल घेत श्रीकृष्ण महिला बचत गटाला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

महिला बचत गटांनाही प्रेरणा

''स्वच्छ शहर, निरोगी पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमात महिला बचत गटांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका विशेष उल्लेखनीय असून त्यांनी केवळ कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविले नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा, समर्पणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना अशा महिला बचत गटांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हा सन्मान इतर महिला बचत गटांनाही प्रेरणा देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.''

- रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

मनःपूर्वक अभिनंदन 

''पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'शून्य कचरा' उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल अत्यंत अभिमानास्पद आहे. 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचे मनःपूर्वक अभिनंदन. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अनुकरणीय आहे. स्थानिक महिला बचत गटांच्या सहभागातून शून्य कचरा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतो, हे श्रीकृष्ण महिला बचत गटाने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.''

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी

''स्वच्छता ही केवळ नागरी सुविधा नसून सार्वजनिक आरोग्याचा भक्कम पाया आहे. 'शून्य कचरा' उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, योग्य संकलन व वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. परिणामी दुर्गंधी, डास व माश्यांची उत्पत्ती कमी होऊन विविध संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागतो. श्रीकृष्ण महिला बचत गटाने गवळीमाथा परिसरात अत्यंत समर्पितपणे काम करत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली आणि लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' पुरस्काराने झालेली दखल ही संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब आहे.''

- डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


महापालिकेसाठी अभिमानाची बाब 

''पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 'शून्य कचरा झोपडपट्टी' उपक्रम हा केवळ स्वच्छता अभियान नसून नागरिकांचा सहभाग, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण यांचा प्रभावी संगम आहे. श्रीकृष्ण महिला बचत गटाने गवळीमाथा परिसरात अत्यंत समर्पित भावनेने काम करत नागरिकांमध्ये कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, स्वच्छतेची सवय आणि पर्यावरणाबाबतची जबाबदारी निर्माण केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वी झाला असून त्याचे सकारात्मक परिणाम परिसरात दिसून येत आहेत. 'नॅशनल प्राईड ऑफ इंडिया' हा पुरस्कार त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल आहे. हा सन्मान संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आणि विशेषतः झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे इतर महिला बचत गटांनाही प्रेरणा मिळेल आणि शहरातील अधिकाधिक झोपडपट्टी भाग शून्य कचऱ्याच्या दिशेने वाटचाल करतील, असा आम्हाला विश्वास आहे. ''

- अण्णा बोदडे, उप आयुक्त, झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories