सोमाटणे टोलनाक्याजवळ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, आरोपी अटकेत
पिंपरी, ता. ९ - सोमाटणे टोलनाक्याजवळ भरदिवसा एका महिलेकडील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ७) दुपारी सुमारे २.५० वाजण्याच्या सुमारास सोमाटणे (ता. मावळ) येथील महाराष्ट्र हॉटेलसमोर, सोमाटणे टोलनाक्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी महिला या त्यांच्या पतीसोबत सुझुकी कॅरी टेम्पोमधून काळेवाडी येथे जात होत्या. तेव्हा आरोपी आसिफ सलीम (वय ३९, रा. तळेगाव दाभाडे) याने त्यांच्या वाहनाच्या डाव्या बाजूने येत जबरदस्तीने गळ्यातील सुमारे १५ हजार रुपये किंमतीचे एक ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेले मंगळसूत्र हिसकावून नेले.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.