चाकण-तळेगाव रस्त्यावर भीषण अपघात, दुचाकीस्वार दाम्पत्य ठार
पिंपरी, ता. ९ - खेड तालुक्यातील भांबोली गाव हद्दीत चाकण ते तळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (ता. ७) दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास डी. वाय. पॉवर कंपनीजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू बाबू मसळे (वय ४०, सध्या रा. आंबेठाण, ता. खेड) हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो (एमएच १४ एलएक्स २०४७) भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत होता. चाकणकडून तळेगावकडे जात असताना समोरून शेलुगाव फाट्याकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला (एमएच १४ केएक्स १२५४) त्याने समोरासमोर जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार मनोहर शिवराम मेंगळे (वय ३६) आणि त्यांच्या पाठीमागे बसलेल्या गीता मनोहर मेंगळे (वय ३४, दोघेही रा. भांबोली, मळकाई वस्ती, ता. खेड) यांना डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या प्रकरणी मनोहर मेंगळे यांचे नातेवाईक हरिभाऊ शिवराम मेंगळे (वय ३९, वाहक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राजगुरुनगर आगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी चालक राजू मसळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.