सनसिटी ते कर्वेनगरला जोडणारा पूल येत्या २६ मे रोजी खुला होणार
पिंपरी, ता. ३ - पुण्यातील आनंदनगर येथील सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. महापौर, महापालिका आयुक्तांनी शनिवारी (ता. २८) या पुलाच्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी कमी करणारा हा पूल पावसाळ्यापूर्वी म्हणजे २६ मे या दिवशी वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मुठा नदीवर आनंदनगर येथील सनसिटी ते कर्वेनगर दरम्यान पुलाच्या कामाची सुरवात सप्टेंबर २०२३ मध्ये सुरुवात झाली. शनिवारी (ता. २८) महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. पुलाच्या उर्वरित कामाचा आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे, पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या पुलामुळे सिंहगड रस्त्यावरुन कर्वेनगर, कोथरूड परिसरात तसेच कोथरुड, कर्वेनगर येथून सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रजला जाणाऱ्या नागरिकांची चांगली सोय होणार आहे. पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन २६ मे रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका विशेष प्रकल्प विभागाने दिली.