वल्लभनगर एसटी स्टॅन्डच्या प्रवेशद्वार रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु, प्रवाशांचा गोंधळ
Mar 27 2026
38
वल्लभनगर एसटी स्टॅन्डच्या प्रवेशद्वार रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु, प्रवाशांचा गोंधळ
पिंपरी, ता. २७ - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगाराच्या प्रवेशद्वार रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे ६ मे २०२६ पर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवले आहे. त्यामुळे बाहेर पडण्याच्या मार्गातून बसेस आता आणण्याच्या तसेच रस्त्यावर बसेस न थांबविण्याच्या सूचना चालक-वाहकांना दिल्या आहेत. पण, त्यामुळे वल्लभनगर स्थानक परिसरात प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
बाहेरुन येणाऱ्या अनेक एसटी बसेस आगारात न जाता त्या रस्त्यावरच थांबून प्रवाशांना उतरवत आहेत आणि आगाराच्या बाहेर पडण्याच्या मार्गातून आत येत आहेत. याबाबत, पुरेशी माहिती न दिल्याने असंख्य प्रवासी नेहमीप्रमाणे बसस्थानकातच गाड्यांची वाट पाहत थांबत आहे आणि त्यांचा गोंधळ उडत आहे. रस्त्यावर प्रवाशांना उतरवण्यासाठी गाडी थांबवल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
आवश्यक सूचना दिल्या आहेत
प्रवेशद्वार रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. ६ मे पर्यंत बाहेर पडण्याच्या मार्गातून बसेस आता आणण्याच्या तसेच रस्त्यावर बसेस न थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वैशाली कांबळे, स्थानकप्रमुख, वल्लभनगर आगार