पिंपरी-चिंचवड : वडमुखवाडी येथे महिलेच्या अपघाताची घटना घडली आहे. वडमुखवाडीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ बसमधून पडून एक महिला प्रवासी जखमी झाली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली. संबंधित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बसचा दरवाजा उघडा ठेवून वेगाने वाहन चालविल्याने आणि अचानक ब्रेक मारल्याने महिला खाली पडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिला पीएमटी बसमधून प्रवास करीत होती. यावेळी चालकाने बसचा दरवाजा उघडा ठेवला होता. तसेच वाहन भरधाव वेगात चालवत होता. दरम्यान, थोरल्या पादुका मंदिराजवळ आल्यावर चालकाने अचानक ब्रेक मारला, ज्यामुळे महिला दरवाजातून खाली पडली.
खाली पडल्यामुळे महिलेच्या डाव्या हाताला, डोक्याच्या मागील बाजूस आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी दिघी पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ आणि १२५(अ) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. सध्या दिघी पोलीस उपनिरीक्षक मुसळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.