आषाढी पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
आषाढी पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे, ता. १३ - आषाढी वारी पालखी सोहळा-२०२६ च्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयात आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपानकाका संस्थानकडून पालखी सोहळ्याची मोठी परंपरा असून, याबरोबर राज्यातील इतर संताच्या पालखी सोहळा पुणे विभागात आल्यानंतर आज पर्यंतच्या परंपरेला साजेसा आणि वारकऱ्यांसाठी अधिक सुविधायुक्त सोहळा आयोजित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ''आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. दरवर्षी लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पालखी प्रमुखांनी बैठकीत मांडलेल्या सूचना आणि अडचणींची दखल घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.''
पालखी सोहळा विश्वस्त, दिंडी प्रमुख आणि स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय राहिल्यास सोहळा अधिक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करून श्रीमती पवार यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश दिले.
या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, विभागीय आयुक्त शितल तेली - उगले, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालखी सोहळ्यांशी संबंधित प्रमुख विश्वस्त, पालखी प्रमुख, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.