प्रमोद ओंबासे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा व कामांची चौकशी व्हावी

प्रमोद ओंबासे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा व कामांची चौकशी व्हावी

पिंपरी-चिंचवड | ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी ओंभासे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद फायली, निविदा आणि कामांची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच बीट मार्शलसंदर्भातील गैरव्यवहारांच्या तक्रारींचीही निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

२९ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागणीप्रकरणी कारवाई केली होती. पाणीपुरवठा विभागातील पाच निविदांच्या करारनाम्यांवर सह्या करण्यासाठी ४५ हजार ७८५ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारीच्या पडताळणीत तीन निविदांच्या फाइलसाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ओंभासे यांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते.

दरम्यान, या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय पारदर्शकतेवर आणि प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.

ओंभासे यांच्या कार्यकाळात हाताळण्यात आलेल्या संशयास्पद फायली, निविदा प्रक्रिया आणि विविध कामांची महापालिका स्तरावर उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, महापालिकेच्या बीट मार्शल व्यवस्थेसंदर्भात गैरव्यवहार, गैरवर्तणूक आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचा दावा भोईर यांनी केला आहे. या सर्व प्रलंबित तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणावी, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रशासनातील अशा कथित गैरप्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास कमी होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.

दोन्ही प्रकरणांच्या चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भोईर यांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहून तातडीने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्यथा जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories