PCMC अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई; आयुक्त सूर्यवंशींचे आदेश

PCMC अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई; आयुक्त सूर्यवंशींचे आदेश

पिंपरी | २९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिक, कंत्राटदार, ठेकेदार किंवा कोणत्याही संस्थांकडून भेटवस्तू आणि देणग्या स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेचे प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने स्वतः भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारू नये. तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा आपल्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींनाही अशा भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश आहेत.

या नियमातील टिप-२ नुसार, शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्याशी कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या व्यक्तींकडून तसेच औद्योगिक, वाणिज्यिक संस्था किंवा संघटनांकडून वारंवार दिला जाणारा पाहुणचार स्वीकारण्याचे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या तरतुदींच्या अनुषंगाने महापालिकेतील सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व देणग्या स्वीकारण्यास मनाई करणारे आदेश देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, महापालिकेच्या सुरक्षा विभागालाही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका कार्यालयात भेटवस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना कार्यालयात प्रवेश करण्यापासून मज्जाव करावा, असे निर्देश सुरक्षा विभागाला देण्यात आले आहेत.

त्यामुळे महापालिका कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींनाही या आदेशांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने स्वतः, कुटुंबीयांमार्फत किंवा आपल्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीमार्फत भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारल्याचे आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात नियमांचे पालन व्हावे आणि प्रशासनातील शिस्त कायम राहावी, या उद्देशाने हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशामुळे महापालिकेतील सर्व विभागांना भेटवस्तू आणि देणग्या स्वीकारण्यासंदर्भातील नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories