सरदार पटेल प्रबोधन पर्व २०२६; ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला विविध कार्यक्रम

सरदार पटेल प्रबोधन पर्व २०२६; ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला विविध कार्यक्रम

पिंपरी | २९ ऑक्टोबर २०२६ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय ‘सरदार वल्लभभाई पटेल प्रबोधन पर्व २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्याने, नाट्यप्रयोग आणि विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प परिसरात एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. यावेळी देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रमही होणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ‘वर्तमान भारतासाठी सरदार पटेल यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ‘अपरिचित सरदार गाथा’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहेत.

रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी होता येणार आहे.

तसेच दुपारी ३ ते ५ या वेळेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून त्यांच्या जीवनकार्याची आणि देशाच्या एकीकरणातील योगदानाची माहिती नागरिकांना मिळणार आहे.

रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘अखंड भारताचे शिलेदार, तुकडे ते राष्ट्र’ हा सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर आधारित नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.

याशिवाय या दोन दिवसीय प्रबोधन पर्वात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनपटावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिकांना सरदार पटेल यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या एकीकरणात सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रनिर्मिती आणि अखंड भारताच्या संकल्पनेशी संबंधित विचारांचा प्रसार करणे, हा या प्रबोधन पर्वामागील प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि युवकांनी या दोन दिवसीय ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories