पैसे कमी करण्याच्या कारणावरुन कुंडी विक्रेत्याच्या डोक्यात घातली कुंडी
पिंपरी, ता. १८ - पैसे कमी करण्याच्या कारणावरुन एका ग्राहकाने कुंडी विक्रेत्याला शिवीगाळ करत कुंडीनेच मारुन जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १७) चऱ्होली फाट्याजवळ घडली आहे. आरोपींवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, जखमी कुंडी विक्रेता राजेश चिमाजी वामन (वय ४५ वर्षे) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ऋषिकेश विठठल तापकीर (वय अंदाजे २५ वर्षे, रा. वडमुखवाडी) व २ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वामन हे त्यांच्या कुंड्यांच्या दुकानावर असताना आरोपी तापकीर यांनी कुंडी कमी पैशामध्ये देण्याची मागणी केली. यावरुन तापकीर व दोन इसमांनी फिर्यादी वामन यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच कुंडीच डोक्यात मारुन जखमी केले.
आरोपींविरोधात दिघी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.