पिंपरी-चिंचवड : चिखलीतील नेवाळेवस्ती परिसरात गाडी चालवताना स्क्रॅच पाडल्याच्या कारणावरून एका चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू अशोक मडीवाल (वय २२, रा. चिखली) यांना दोन जणांनी मारहाण केली. ५ नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास नेवाळेवस्तीतील जलशुद्धीकरण केंद्राजवळ, नवीन ज्ञानसागर शाळेसमोर ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडीवाल यांनी अर्जुन नेवाळे यांची गाडी चालवताना तिला स्क्रॅच पाडल्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घातला. गाडीचे नुकसान झाल्याच्या कारणावरून दोघांनी त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भरत करपे आणि त्याच्या एका मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत करपे याने बेल्टने मडीवाल यांना मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.