पिंपरी-चिंचवड : मोशीतील देहू-आळंदी रस्त्यावरील बांधकामाच्या ठिकाणाहून सुरक्षा रक्षकाला धमकावून ८० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम प्लेट चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान दशरथ लवंगारे (वय ५२, रा. निगडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, गुरुवारी (५ नोव्हेंबर) लवंगारे मोशीतील एका बंगल्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. पहाटे सव्वातीनच्या सुमारास चार जण रिक्षातून तेथे आले. त्यापैकी एकाने लाकडी दांडके दाखवत त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करून धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर बंगल्याच्या शेजारील बांधकामाच्या ठिकाणाहून ॲल्युमिनियमच्या सहा शटरिंग प्लेट जबरदस्तीने चोरून नेण्यात आल्या. या साहित्याची एकूण किंमत ८० हजार रुपये असल्याची नोंद आहे. प्लेट रिक्षात ठेवून चौघे चिखलीच्या दिशेने पळून गेल्याचा आरोप आहे.
लक्ष्मण रमेश माने (वय ३०, रा. पिंपरी), विकास आंबेडकर कांबळे (वय २२, रा. पिंपरी) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (६ नोव्हेंबर ) भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक मणेर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.