पिंपरी-चिंचवड | ६ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कलाकारांना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार शंकर जगताप यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि कै. लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील पंडित पद्माकर कुलकर्णी कला मंदिरात कलाकार कट्ट्याचा वर्धापन दिन आणि रंगभूमी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जगताप यांनी ही घोषणा केली.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष तथा कलाकार कट्ट्याचे संस्थापक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, नाट्य परिषदेचे पदाधिकारी, कलाकार आणि रसिक उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, नाटक, संगीत आणि कला या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कोविड काळात कलेचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले. शहरातील नवोदित कलाकारांना संधी मिळावी आणि नाट्य चळवळ अधिक समृद्ध व्हावी, यासाठी राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुरेश कंक, वृषाली भणगे, ऋतुजा महाजन, गणेश कांबळे, शुभ्रा घायतडके आणि केतन लुंकड यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच ‘नांदी नव्या पर्वाची, शोध प्रतिभेचा जागर कलेचा’ या घोषवाक्यांतर्गत कलाकार कट्ट्याने वर्षभर आयोजित केलेल्या कार्यक्रमांची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
भाऊसाहेब भोईर यांनी शहराच्या नाट्य चळवळीतील विविध नेत्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. शरद पवार, दिवंगत अजितदादा पवार, दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप, माजी आमदार विलास लांडे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी रंगभूमीच्या विकासासाठी योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
कलाकार कट्ट्याने वर्षभरात नाटक, संगीत, नृत्य, काव्य आणि चित्रकला अशा विविध कलाप्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे भोईर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर तबलावादन, नृत्य, बालनाट्य, काव्यवाचन आणि गायनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. नृत्यार्पण ग्रुपच्या कनक देशमुख, वृंदा जोशी, निहारिका शिंदे आणि इशा झा यांनी नृत्य सादर केले. बालकलाकारांनी बालनाट्याच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
सुरेश कंक, संजय गमे आणि राधाबाई वाघमारे यांनी काव्यवाचन केले. स्वर सुधा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गायन सादर केले. आसाराम कसबे यांनी भारुड, तर शुभ्रा घायतडके यांनी दिवंगत लावणी कलावंत मधू कांबीकर यांना आदरांजली म्हणून लावणी सादर केली.
गणेश कांबळे यांनी शेतकरी आत्महत्येच्या सामाजिक प्रश्नावर आधारित कलाविष्कार सादर केला. तसेच वैशाली गायकवाड आणि रती देशमुख यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात राजेंद्र बंग, राज अहेरराव, प्रकाश ढवळे, किरण येवलेकर, रवी दामोदरे, गौरी लोंढे आणि पंकज चव्हाण यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले, तर आभार आकाश थिटे यांनी मानले.