आळंदी : सोळु येथील आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका भंगार दुकानात चोरीची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्रफ स्क्रॅप सेंटरमधून हजारोंची रोख रक्कम आणि एक मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार आळंदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (५ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुकानाच्या मागील भिंतीवरून आत प्रवेश करून चोरी केल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या चोरीत दुकानातून ९० हजार रुपये रोख आणि एक मोबाइल चोरीला गेला आहे.
भंगार व्यावसायिक दयानत तुल्ला खान (वय ३९) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांचे दुकान सोळू गावातील राही पेट्रोलपंपासमोर आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी त्यांच्या संमतीशिवाय दुकानाच्या पाठीमागील भिंतीवरून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने दुकानात शिरल्यानंतर तेथील लाकडी टेबलच्या ड्रॉवरमधील पैसे आणि टेबलवरील मोबाइल नेण्यात आला.
दुकानातील लाकडी टेबलचा ड्रॉव्हर चावीच्या साहाय्याने उघडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली ९० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली. याशिवाय टेबलवर ठेवलेला आकाशी रंगाचा विवो कंपनीचा मोबाइलही नेण्यात आला. फिर्यादीने या चोरीप्रकरणी वाघोली येथील आदर्श अंकुर ईटकर, ओम भालेकर, सिद्धार्थ मनोहर या तीन जणांसह त्यांच्या मित्रांविरुद्ध तक्रार दिली आहे.
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी (5 नोव्हेंबर) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दुधमल या प्रकरणाचा तपास करीत आहेत.