पुणे : माजी सैनिक, त्यांच्या विधवा आणि पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांच्या वतीने राबिवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत आर्थिक मदत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांच्या हस्ते गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात धनादेश प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान 10 लाभार्थ्यांना विविध योजनांमधून आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले आहे. याअंतर्गत एकूण 10 लाख 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले आहे.
यात माजी सैनिकांना स्वयंरोजगारासाठी 3 लाख रुपये, सैन्यसेवेत असताना 46.04 टक्के अपंगत्व आलेल्या सैनिकांना 25 हजार रुपये, सदनिका खरेदीसाठी पाच लाभार्थ्यांना एकूण 4 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
तसेच अधिकारी शिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास प्रत्येकी 1 लाख रुपये, तर सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाल्याच्या माजी सैनिक पालकास 50 हजार रुपये अशी मदत देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित लावली होती. या कार्यक्रमात, जितेंद्र डूडी यांनी नागरिकांना सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने योगदान देऊन माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांना, विधवांना आणि आश्रितांना आर्थिक मदत देणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. देशाच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी या निधीचा विनियोग करण्यात येतो.