महिलांना दिलासा! एसटीचे NCMC स्मार्ट कार्ड आता १ जानेवारी २०२७ पर्यंत अनिवार्य नाही

महिलांना दिलासा! एसटीचे NCMC स्मार्ट कार्ड आता १ जानेवारी २०२७ पर्यंत अनिवार्य नाही

मुंबई | ६ नोव्हेंबर २०२६ : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिलांना प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नवीन निर्णयानुसार, १ जानेवारी २०२७ पर्यंत महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार नाही. त्यामुळे ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेता येणार आहे.

एसटी महामंडळाने प्रवास सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख स्मार्ट कार्डांची नोंदणी आणि वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे.

ही बाब लक्षात घेऊन विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री यांच्याकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे

राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महामंडळाने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची १०० टक्के नोंदणी आणि कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना नोंदणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवास सवलतींचे व्यवस्थापन अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा महामंडळाचा उद्देश आहे. मात्र, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पात्र महिला प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories