चिखली | ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात चाकणला एका महिलेला भेटण्यासाठी जाण्यास पत्नीने नकार दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पत्नीला शिवीगाळ करत तिचा गळा पकडला आणि हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तोंडावर बुक्की मारल्याने महिलेचा खालच्या बाजूचा एक दात पडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास चिखलीतील धर्मराजनगर परिसरात घडली.
या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे.
आरोपीचे नाव संजय चिंधू लोहार (वय ४२ वर्षे) असे असून, तो फिर्यादी महिलेचा पती आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्या दिवशी फिर्यादीचे पती संजय लोहार हे फिर्यादीच्या मुलीसह राहत्या घरी होते. त्यावेळी संजय लोहार यांनी उर्मिलाला भेटण्यासाठी चाकण येथे जायचे असल्याचे फिर्यादीला सांगितले.
मात्र, फिर्यादीने त्यांना तिकडे जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीने ‘तू मला शिकवू नकोस, थांब आता तुला घरीच घेऊन येतो बघतोच तू व तुझे घरचे काय करतात’ असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप आहे.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून गळा पकडत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीदरम्यान आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर बुक्की मारली. त्यामुळे फिर्यादीचा पुढील खालच्या बाजूचा एक दात पडून त्या जखमी झाल्या, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११७(२), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.