पिंपरी भाटनगरमध्ये तरुणावर चाकूने हल्ला; आरोपींच्या धमकीने नागरिकांची पळापळ

पिंपरी भाटनगरमध्ये तरुणावर चाकूने हल्ला; आरोपींच्या धमकीने नागरिकांची पळापळ

पिंपरी | ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील भाटनगर परिसरात  एका २६ वर्षीय तरुणावर चाकू आणि फायटरने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी परिसरातील नागरिकांना धमकावत दहशत निर्माण केल्याने नागरिक भीतीने पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भाटनगर येथील गिरजुबाबा मंदिरासमोर, बी. क्रमांक १० व ११ च्या खाली घडली.

या प्रकरणी अक्षय बाबू पांढरे (वय २६ वर्षे, रा. भाटनगर, पिंपरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि त्यांचे मित्र नाक्यावर थांबले असताना आरोपी कार्तिक ऊर्फ लखन कैलास साठे (वय २४), गणेश साठे (वय २६), एक विधिसंघर्षित बालक आणि सुजीत  तेथे आले.

आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी कार्तिक साठे याने फिर्यादीला धमकावले. त्यानंतर त्याने इतर साथीदारांना हल्ला करण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

कार्तिक साठे याने हातातील चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला, तर गणेश साठे आणि विधिसंघर्षित बालकाने फायटरने मारहाण केल्याचा आरोप आहे.

तसेच सुजीत याने फिर्यादीला खाली पाडून लाथांनी मारहाण केली. विधिसंघर्षित बालकाने लोखंडी फायटरने फिर्यादीच्या उजव्या गालावर नाकाजवळ वार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या हल्ल्यादरम्यान फिर्यादीचे मित्र अतुल, अली आणि सनी हे कार्तिकच्या मारहाणीच्या भीतीने पळून गेले.

त्यानंतर कार्तिक साठे याने हातातील चाकू हवेत फिरवत परिसरातील नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली. आरोपींनी नागरिकांच्या दिशेने धाव घेत त्यांना धमकावल्याने परिसरातील नागरिक भीतीने पळून गेले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००२/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११८(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories