२३ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

२३ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

काळेवाडी | ३० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणावर तिघांनी कोयत्याने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्याचा गळा दाबला आणि डोक्यात कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील इंडियन कॉलनीतील गोरखनाथ मंदिरासमोर घडली.

या प्रकरणी आकाश दत्ता पवार (वय २३ वर्षे, काळेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ते घरी पायी जात असताना त्यांच्या कॉलनीत राहणारे आरोपी अचानक त्यांच्या समोर आले.

या प्रकरणात अक्षय ऊर्फ गोट्या छत्री (रा. भीमनगर, पिंपरी), कृष्णा सोनवणे (रा. रहाटणी) आणि शकलीन शेख (रा. इंडियन कॉलनी, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी आणि आरोपींमध्ये तीन दिवसांपूर्वी फोनवरून भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला अडवल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यावेळी कृष्णा सोनवणे याने फिर्यादीला उद्देशून जुन्या भांडणावरून जाब विचारला, तर शकलीन शेख याने इंडियन कॉलनीतील वर्चस्वाबाबत धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादीच्या आरोपानुसार, अक्षय ऊर्फ गोट्या छत्री याने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीचा गळा हाताने दाबला. तसेच शकलीन शेख याने हातातील लाकडी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. मात्र, फिर्यादीने चुकवल्याने तो वार पाठीवर लागला.

त्यानंतर कृष्णा सोनवणे याने कोयता घेऊन फिर्यादीच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीने जोरात आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला आले. त्यावेळी कृष्णा सोनवणे याने हातातील कोयता हवेत फिरवत नागरिकांना धमकावले. कोणी मध्ये आल्यास त्याच्यावरही हल्ला करण्याची धमकी दिल्याने जमलेले नागरिक भीतीने पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४(२५), २७ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories