उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गूँगी गुडिया' उल्लेख केल्याप्रकरणी राजकीय-सामाजिक क्षेत्रातून कॉंग्रेसवर टीका
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गूँगी गुडिया' उल्लेख केल्याप्रकरणी राजकीय-सामाजिक क्षेत्रातून कॉंग्रेसवर टीका
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसने सोशल मिडीयावर केलेल्या 'गूँगी गुडिया' या उल्लेख केल्यामुळे राज्यातील राजकीय-सामाजिक क्षेत्रातून कॉंग्रेसवर टीका केली जात आहे. यावर सुनेत्रा पवार यांनी 'योग्य वेळी उत्तर देऊ' असे म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक व्हिडिओ काँग्रेसने सोमवारी (ता. ३) सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एका पत्रकार परिषदेत आमदार धनंजय मुंडे हेच बोलत असताना सुनेत्रा पवार शांत बसल्या असल्याचा उल्लेख करत, 'सुनेत्रा पवार अजून किती दिवस 'गूँगी गुडिया' बनून राहणार?' असे म्हटले होते.
यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता गांधी भवनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 'राष्ट्रवादी'चे कार्यकर्ते कार्यालयात घुसले. यावेळी 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागण्याची मागणी केली. पुण्यात व पिंपरीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित पोस्ट 'डिलिट' करण्याचे आवाहन काँग्रेसला केले. सुनेत्रा पवार यांनी 'योग्य वेळी उत्तर देऊ' असे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ''काँग्रेसकडून खालच्या पातळीवरची टीका करण्यात आली आहे. हल्ली त्यांच्या पक्षाला कुणी विचारतही नाही आणि प्रतिसाददेखील देत नाही. चर्चेमध्ये राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. 'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ' अशा पद्धतीने टीका केली जात आहे.'' ''जनतेने काँग्रेसला त्यांची जागा दाखविली असून त्यांना घरी बसविले आहे. काँग्रेसने हे समजून घ्यावे आणि जे विधान केले आहे, त्याबद्दल माफी मागावी. आज त्यांची देशात, राज्यात काय स्थिती आहे. त्यांचे नेते परदेशात जाऊन पंतप्रधान, देशाचा अपमान करतात.'', अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
यावर, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ''उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल 'गूँगी गुडिया' शब्द वापरला. तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीयही नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही 'गूँगी गुडिया' असे संबोधले गेले होते. पण त्यांनी कर्तृत्वातून कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना 'दुर्गा' म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून दुर्गा असल्याचे दाखवून द्यावे.''