पिंपरी | 18 सप्टेंबर 2026 : गणेशोत्सवाशी जोडलेल्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आठवणी, परंपरा आणि सांस्कृतिक अनुभव आता डिजिटल स्वरूपात जतन करता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी ‘Bappa.org’ हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात पिंपरी-चिंचवडमधील नागरिक, कुटुंबे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये अनेक कुटुंबे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वर्षानुवर्षे वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. आरत्या, पारंपरिक प्रथा, सजावट, नैवेद्य, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बाप्पाशी जोडलेल्या कौटुंबिक आठवणी या उत्सवाला वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देतात. या आठवणींची डिजिटल नोंद शहराच्या सांस्कृतिक स्मृती जतन करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
‘Bappa.org’ वर नागरिकांना गणेशोत्सवाशी संबंधित विविध प्रकारची माहिती नोंदविता येणार आहे. यामध्ये घरातील गणपतीच्या आरत्या व पारंपरिक प्रथा, कुटुंबातील जुन्या आठवणी, पारंपरिक पाककृती, गणेशमूर्तींची छायाचित्रे, सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे उपक्रम, सामाजिक कार्य आणि उत्सवाशी संबंधित अनुभवांचा समावेश आहे.
आजच्या काळातील गणेशोत्सवाच्या आठवणी आणि परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सांस्कृतिक दस्तऐवज ठरू शकतात. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि आठवणी या डिजिटल व्यासपीठावर नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापौर रवि लांडगे यांनी गणेशोत्सवाशी जोडलेल्या आरत्या, प्रथा, आठवणी, कला आणि सामाजिक उपक्रमांची डिजिटल नोंद हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गणेशोत्सवातील श्रद्धा, कला, लोकपरंपरा, सामाजिक सहभाग आणि सामुदायिक एकोप्याचे विविध पैलू या उपक्रमामुळे डिजिटल स्वरूपात जतन होण्यास मदत होईल, असे सांगितले.