पिंपरी-चिंचवड | २८ ऑक्टोबर २०२६ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवार स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अपेक्षित काम केले नसल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. विशेषतः भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रचारातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
काळभोर यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याऐवजी काही पदाधिकाऱ्यांनी बैठका, फोटोसेशन आणि वरिष्ठ नेत्यांच्या आसपास राहण्यावर अधिक भर दिला. मतदार नोंदणी, वैयक्तिक संपर्क आणि मतदानासाठी मतदारांना प्रवृत्त करण्याच्या कामात अपेक्षित सक्रियता दिसली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी अपेक्षित योगदान दिले नाही, असा आरोप काळभोर यांनी केला. चिंचवड मतदारसंघाबाहेर भोसरी विधानसभा मतदारसंघात फिरताना प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधण्याऐवजी इतर बाबींना प्राधान्य दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रचारात आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, मोरेश्वर शेंडगे, सदाशिव खाडे आणि शीतल शिंदे यांनी सक्रियपणे काम केल्याचे सांगत काळभोर यांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे. मागील निवडणुकीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळलेल्या पक्षाच्या एका माजी सरचिटणीसांना यंदा जबाबदारी देण्यात आली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीला केवळ १९ कार्यकर्ते उपस्थित होते, असे काळभोर यांनी म्हटले आहे. त्यापैकी काही जण स्वतः पदवीधर मतदार नसल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रचार नियोजनाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे. पदवीधर मतदार नोंदणी, प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि मतदान वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची तपासणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी काम करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवर कठोर संघटनात्मक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, हे आरोप सचिन काळभोर यांनी केलेले असून, त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. या आरोपांबाबत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.