निगडी येथील प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाबाबत सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावा

निगडी येथील प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाबाबत सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावा

पिंपरी-चिंचवड | २९ ऑक्टोबर २०२६ : निगडी येथील सुमारे २५ एकर जागेवर प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या प्रकल्पाचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक निलेश तरस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

निगडी परिसरात प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पामुळे पर्यावरण, हवेची गुणवत्ता आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी भूमिका तरस यांनी मांडली आहे.

नगरसेवक या नात्याने नागरिकांच्या हिताचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी प्रकल्पासंदर्भातील नागरिकांच्या शंका आणि हरकतींचे निराकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

प्रकल्पाचा सविस्तर अहवाल, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रस्तावित उपाययोजनांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व बाबी नागरिकांसमोर स्पष्ट झाल्यानंतरच पुढील निर्णय घेणे योग्य ठरेल, अशी त्यांची भूमिका आहे.

याशिवाय, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही नगरसेवक निलेश तरस यांनी केली आहे. या बैठकीत नागरिकांच्या सूचना आणि हरकती ऐकून घेऊन त्यांची अधिकृत नोंद करण्यात यावी. तसेच नागरिकांच्या मनातील शंकांचे निराकरण करावे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निगडीतील प्रस्तावित प्रकल्पाबाबत निर्णय घेताना नागरिकांचे आरोग्य, पर्यावरणाचे संरक्षण आणि परिसरातील हवेची गुणवत्ता या बाबींना प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे तरस यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकल्पाच्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करून नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत नियमानुसार योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

तसेच या निवेदनाच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रकल्पाच्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या चिंतेची दखल घेऊन महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, तसेच नागरिक आणि लोकप्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक आयोजित करते का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories