इन्शुरन्स पॉलिसी'च्या लाभाचे आमिष दाखवून ३० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक
पिंपरी, ता. १७ - विमा कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत 'टर्म इन्शुरन्स पॉलीसी'च्या आर्थिक लाभाचे आमिष दाखवून रुपीनगर-तळवडे येथील एका नोकरदाराची ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणुकीची ही घटना ५ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली आहे. आरोपीवर मंगळवारी (ता. १६) चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, फसवणुकीला बळी पडलेले इंद्रजित विजयसिह भोसले (वय ५१ वर्षे, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव पंकज तिवारी (पूर्ण नाव माहित नाही) असे असून तो नवी दिल्ली येथील रहिवासी आहे.
आरोपीने 'बीमा लोकपाल, दिल्ली येथून बोलत आहे.', अशी बतावणी केली. पुढे, ''तुम्हाला ६० करोड रुपयाची टर्म इन्शुरन्स पॉलीसी दयायची आहे. सदर पॉलिसी विषयी माहिती दिली व तुम्ही अॅडमिट झालात तर तुम्हाला लगेच २ ते ३ लाख रुपये येणार, शिवाय तुमची परिवारातील सर्व सभासद यामध्ये कव्हर होणार.'', असे आमिष दाखवले. फिर्यादी भोसले यांचा विश्वास संपादन करुन खोटे सांगून विश्वासघात केला. विविध बँक खात्यामध्ये वेळोवेळी एकूण ३०,२५,९२६/- रुपये ऑनलाईन स्वरुपात जमा करुन घेऊन भोसले यांना लुबाडले.
आरोपीवर या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१६ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.