परदेशी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

परदेशी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

परदेशी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी, ता. २६  - परदेशी शेअर बाजार, स्टॉक मार्केट आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास २०० ते ३०० टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवून चिंचवडमधील एका व्यावसायिकाची ८८ लाख २६ हजार ३४२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फसवणूक झालेल्या इसमाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे‌. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी ते ६ जून २०२६ या कालावधीत फिर्यादीला एक लिंक पाठविण्यात आली. त्यावर परदेशी शेअर बाजार, स्टॉक मार्केट आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादीने सुरुवातीला एक लाख २० हजार ९०० रुपयांची गुंतवणूक केली.

त्यानंतर ऑनलाइन खात्यावर ५० हजार ३४९ अमेरिकन डॉलर इतका नफा झाल्याचे दाखविण्यात आले. हा नफा काढण्यासाठी 'कन्व्हर्जन फी', 'फायलिंग फी', 'कॅपिटल गेन टॅक्स', 'इन्शुरन्स', 'सेबी शुल्क', 'लायसन्स फी', 'जीएसटी' आणि 'ब्रोकरेज' अशा विविध कारणांनी वारंवार रक्कम भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ८८ लाख २६ हजार ३४२ रुपये जमा करून घेतल्यानंतरही रक्कम परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी लिंक धारक, विविध बॅंक खातेधारक आरोपी आहेत. सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३६, ३३८, ३४०, ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories