पुढील पाच वर्षांत राज्यात औद्योगिक वीज दर कमी होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, ता. १८ - पुढील पाच वर्षांत राज्यात औद्योगिक वीज दर दरवर्षी १.२ टक्क्यांनी कमी केले जातील. सध्या महाराष्ट्रात औद्योगिक विजेचा दर प्रति युनिट ₹८.३२ आहे, सन २०२९-३० पर्यंत प्रति युनिट ₹७.३८ पर्यंत कमी होईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.
सौर ऊर्जेची वाढती उपलब्धता लक्षात घेऊन सरकारने आपल्या धोरणात सुधारणा केली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या उद्योगांना आता २५ टक्के सवलत मिळणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने यापूर्वी कृषी ग्राहकांसाठी वीज दरात ३० टक्क्यांनी वाढ केली होती.
राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर आयोगाने स्वतःहून आपला आदेश मागे घेतला. ज्यामुळे शेतकऱ्यांवरील वाढीव दरांचा भार कमी झाला.
मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना बॅटरी स्टोरेज सिस्टीमचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सध्या प्रति युनिट खर्च २.८० ते २.९० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. ज्यामुळे सवलतीच्या दरात २४ तास वीजपुरवठा करणे शक्य झाले आहे.
महावितरणने वार्षिक महसुलात ₹१ लाख कोटींचा टप्पा ओलांडला असून ती देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी बनली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.