news
clock

मार्केटयार्डात पाणी टंचाई, बाजार समितीने पाणीप्रश्न सोडवावा,  विक्रेत्यांची मागणी

पुणे, ता. १८ - मार्केटयार्डातील भुसार, फळे, भाजीपाला, फूल बाजारात पाण्याची टंचाई भासत आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येते तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी विक्रेत्यांची तक्रार आहे. मार्केटयार्ड या अत्यावश्यक सेवेत पाणी उपलब्ध झाले पाहिजे. बाजार समितीने पुढाकार घेऊन त्वरित मुबलक पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी बाजारातील विक्रेत्यांनी केली आहे.

विक्रेत्यांनी सांगितले की, गॅस टंचाईमुळे शेतीमालाची विक्री कमी झाली आहे. भाज्यांच्या भावात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यातच आता मार्केटयार्डात पाणीटंचाईने व्यापारी वैतागले आहेत. फूल बाजारात पाणीच येत नसल्याने हाल होत आहेत. येथील हॉटेलांमध्ये पाण्याचा टॅंकर मागवावा लागत आहे. 

दि पूना मर्चेंट्स चेंबरचे संचालक विजय मुथा म्हणाले की, ''मार्केट यार्डात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. आसपास असणाऱ्या सोसायट्यांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होतो, मग, मार्केट यार्डातच पाणी टंचाई का निर्माण होते. बाजार समितीने पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे.''

पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा होईल....

''महापालिकेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा सध्या कमी दाबाने होत आहे. त्यामुळे बाजार आवारात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल.''

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories