महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अभ्यासले निढळ गावातील 'ग्रामीण विकासाचे यशस्वी मॉडेल'
महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अभ्यासले निढळ गावातील 'ग्रामीण विकासाचे यशस्वी मॉडेल'
पिंपरी, ता. २६ - पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने आयोजित शैक्षणिक अभ्यास दौऱ्याअंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी निढळ गावाला भेट देऊन तेथील विविध विकास उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
दौऱ्या दरम्यान सहभागी सदस्यांनी ग्रामपंचायत निढळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान विद्यालय तसेच गावातील विविध विकास प्रकल्पांना भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात गावाच्या विकास प्रवासाची, लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या योजनांची आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत झालेल्या कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. निढळ गावाच्या विकासामध्ये जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विविध बंधारे, शेततळी, भूजल पुनर्भरण, जलव्यवस्थापन आणि पाणी संवर्धनाच्या उपाययोजनांमुळे गावातील जलसंपदा वाढली असून शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. गावाने 'चला पाणी जपून वापरूया' हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारला असल्याचे पाहायला मिळाले.
शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हनुमान विद्यालय यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, डिजिटल सुविधा, स्वच्छ व आकर्षक परिसर आणि विद्यार्थकिंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे.याशिवाय गावातील उद्योजकता विकास, महिला बचत गटांची कार्यपद्धती, स्वच्छता अभियान, हरित परिसर निर्मिती, सामाजिक एकात्मता आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास यांचाही अभ्यास करण्यात आला. प्रभावी नेतृत्व, लोकसहभाग आणि दीर्घकालीन नियोजन यांच्या साहाय्याने निढळ गावाने शाश्वत विकासाचा आदर्श साकारला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निढळ गावाने गेल्या ४४ वर्षांत ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना ग्रामीण विकासाच्या यशस्वी मॉडेलचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, ग्रामविकासाची जाणीव आणि शाश्वत विकासाच्या संकल्पना रुजविण्यासाठी अशा अभ्यास भेटी उपयुक्त ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. हा अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पांडुरंग भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्यांच्या व स्टाफ वेलफेअरच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.