राज्यातील दत्तक प्रक्रियेचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा
पिंपरी, ता. ५ ऑगस्ट २०२६ - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दत्तक प्रक्रियेचा आढावा घेतला. राज्यातील दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्या म्हणाल्या, ''राज्यात दत्तक प्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती आहे. महाराष्ट्र देशात अव्वल आहे. मात्र, काही प्रकरणांमध्ये नातेवाईकांच्या संमतीचा अभाव, वैद्यकीय चाचण्या आणि इतर कायदेशीर बाबींमुळे विलंब होतो. ही प्रक्रिया अधिक जलद आणि परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करुन राज्यातील प्रलंबित दत्तक प्रकरणांचा सविस्तर अहवाल सादर करावा. प्रत्येक कायदेशीररित्या मुक्त बालकाला सुरक्षित, स्थिर आणि प्रेमळ कुटुंब मिळावे, यासाठी ही प्रक्रिया अधिक वेगवान करण्यावर भर द्यावा.''
🔘 दत्तक प्रक्रियेसंदर्भातील राज्यातील आकडेवारी
राज्यात सध्या ६२ विशेष दत्तक संस्था कार्यरत. २०२६-२७ मध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील १,२८३ बालके दत्तकासाठी कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध. यावर्षी आतापर्यंत १५७ बालकांना दत्तक दिले. नातेवाईकांमार्फत २३९ बालकांची दत्तक प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण.
🔘 दत्तक प्रक्रियेबाबत...
दत्तक प्रक्रिया केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण, राज्य दत्तक संसाधन संस्था, विशेष दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा दंडाधिकारी आणि दत्तक इच्छुक पालक यांच्या समन्वयातून दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (सीएआरए) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते.
इच्छुक पालकांनी केंद्र सरकारच्या CARINGS पोर्टलवर https://cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी आवश्यक.