चिखलीत भीषण अपघात ; कंटेनरखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

चिखलीत भीषण अपघात ; कंटेनरखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

चिखली : चिखली परिसरात अज्ञात वाहनाने एका दुचाकीस्वाराला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या डाव्या बाजूला पडून कंटेनरच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जखमीच्या पत्नीच्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात दोन वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाइन रस्त्यावरील जाधव सरकार चौकात बुधवारी (४ नोव्हेंबर) रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, महिलेचे पती हिरो कंपनीच्या एचएफ डिलक्स मोटारसायकलवरून जात होते. ते रस्त्याच्या उजव्या बाजूच्या लेनमध्ये असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. संबंधित वाहनचालक भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्याच्या डाव्या बाजूला पडला. त्याचवेळी मधल्या लेनमधून जाणाऱ्या  कंटेनरच्या मागील चाकाखाली तो आला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा चालक आणि कंटेनरचा चालक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेची कलमे २८१, १२५(अ), १२५(ब) आणि ३२४(४), तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार जायभाये या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories