पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक
मावळ, पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार, आमदार महेश लांडगे यांची माहिती
पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३ जुलै २०२६ रोजी संयुक्त बैठक विधानभवनामध्ये होणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला पिंपरी-चिंचवड आणि मावळातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सध्या पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्येही या विषयावर मतमतांतरे आहेत. मात्र, शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पवना धरणावरील जलवाहिनी प्रकल्प आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक व्हावी आणि प्रकल्पाला गती द्यावी, यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय यांना विनंती केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
राज्यातील भाजप महायुती सरकारने वर्षभरापूर्वीच पवना थेट जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’आदेश रद्द केला आहे. त्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यापूर्वी या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठकीसंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. शुक्रवार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता विधानभवन, मुंबई येथे बैठक नियोजित केली आहे. त्यामुळे सुमारे ४० लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे, असे लांडगे यांनी सांगितले.
"पवना जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यासाठी सातत्त्याने हा प्रश्न आम्ही विधानसभा सभागृहात आणि मंत्री महोदय यांच्या बैठकांमध्ये मांडला आहे. त्याला आता मूर्तरुप येताना दिसत आहे. हा प्रकल्प राबविताना मावळमधील शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांच्या भावना व हितालाही तितकेच महत्त्व दिले जाईल, असा विश्वास आहे.'', असे आमदार लांडगे म्हणाले.
