क्राइम रिपोर्ट -
शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २७ जुलै २०२६
🔴 सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरून दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा
सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःचे बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिस शिपाई समीर शब्बीर महात (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय नेताजी सुतार (वय २५, रा. ता. खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ६१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने महाळुंगे-चाकण-तळेगाव रोड येथील एका बँकेतील स्वतःच्या नावावरील बँक खाते साथीदारांच्या संगनमताने सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिले. या खात्यामध्ये देशभरातील सात नागरिकांच्या सायबर फसवणुकीशी संबंधित तक्रारींतील एकूण ६२ हजार रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कंटेनरच्या धडकेत आई आणि दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने आई आणि दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना डोंगरवस्ती-निघोजे (ता. खेड) येथे घडली. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी माधव नारायण चोपलवाड (वय ३२, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनरचालक सचिन यादव (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २६) सकाळी साडेसातच्या सुमारास हरिदास दिगंबर उतलवाड (वय ४०) हे त्यांच्या मोटारसायकलवरुन मावस बहिण मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय २५) आणि तिचा दीड वर्षांचा मुलगा देवांश (दोघे रा. नांदेड) यांना घेऊन स्पायसर चौकातून निघोजे मार्गे खालुंब्रेकडे जात होते. हॉटेल पंचरत्नसमोर भरधाव कंटेनर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मंगल चोपलवाड आणि देवांश यांचा मृत्यू झाला आणि हरिदास उतलवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------
🔴 कोयत्याचा धाक दाखवून दुकानातून भर दिवसा ३० हजार रुपये लंपास, पिंपरीतील घटना
पिंपरीतील रिव्हर रोड परिसरातील कपडे मार्केटमध्ये चॉईस व्हरायटी या दुकानात तीन अल्पवयीन गुन्हेगारांनी कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम, पूजेची पितळी नाणे व गुरु लीलाशाबाबा यांचा फोटो हे साहित्य चोरुन नेले. ही घटना रविवारी (ता. २६) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे व दोघे फरार झाले आहेत. तिघांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकान व्यावसायिक हर्ष प्रदीप पगाराणी (वय २१, रा. वैभवनगर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी सुमारे ४.२२ च्या सुमारास फिर्यादी, त्यांचे वडील आणि तीन कामगार दुकानात असताना तीन अल्पवयीन गुन्हेगारांनी कोयते घेऊन दुकानात प्रवेश केला. अगोदर हप्ता म्हणून रक्कमेची मागणी केली. कोयत्याचा धाक दाखवत आरोपींनी दुकानातील ३० हजार रुपये रोख, पूजेसाठी ठेवलेली पितळी नाणी आणि गुरु लीलाशाबाबा यांचा फोटो जबरदस्तीने घेऊन पळ काढला.
फिर्यादी यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने फायटरसदृश धारदार हत्याराने त्यांच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. दरम्यान, मदतीसाठी आलेल्या इतर दुकानदारांनाही आरोपींनी कोयते दाखवत, "मध्ये आल्यास तुकडे करून टाकू," अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे शेजारील अनेक दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने बंद केली. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दोघांचा शोध सुरु आहे.
या प्रकरणी आरोपींविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१(३), ३(५), क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) अॅक्ट कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 काळेवाडीत सायबर फसवणूक; बँक खात्याच्या धारकावर गुन्हा
सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारासाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून देऊन त्यातून फिर्यादीचे रुपये २५ हजार एटीएमद्वारे काढून घेतल्याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी रविवारी (ता. २६) काळेवाडी पोलिस ठाण्यात एका बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीची ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली आहे.
या प्रकरणी तेजस दीपक जगताप (पोशि क्र. ३८७३, काळेवाडी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी खाजप्पा दौलप्पा शिंगे (रा. काळेवाडी, रहाटणी) याने स्वतःच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्याचा वापर करून साथीदारांशी संगनमताने संघटित सायबर गुन्हेगारीत सहभाग घेतला. सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारासाठी संबंधित खाते वापरण्यास देण्यात आले. त्या खात्यातून फिर्यादीचे रुपये २५ हजार एटीएमद्वारे काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २६) भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 आळंदीतील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठाणमध्ये २ लाखांच्या अपहाराप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
श्रीहरी गोविंद प्रतिष्ठाण, आळंदी येथील मानधनाच्या धनादेशांचा गैरवापर करून संस्थेचे २ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संस्थेच्या अध्यक्षा अनिता भाऊसाहेब कड (वय ६४, रा. बाणेर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींची नावे कीर्ती राजेश सोमाणी (रा. परभणी), राजेश रामेश्वर सोमाणी (रा. परभणी) आणि संस्थेचे कोषाध्यक्ष कमलकिशोर मंत्री (रा. कोथरूड, पुणे) अशी आहेत. श्रीहरी गोविंद प्रतिष्ठाणतर्फे अध्यात्मिक प्रचारासाठी सद्गुरू रामेश्वर सोमाणी यांना मानधन म्हणून धनादेश देण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर दोन धनादेशांचा आरोपींनी संगनमताने गैरवापर करून संस्थेच्या रुपये २ लाखांचा अपहार केला आहे.
आरोपींविरुद्ध रविवारी (ता. २६) आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३ (५) प्रमाणे आणि भारतीय दंड विधान कलम ४०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 किरकोळ कारणावरुन तरुणीने तरुणाच्या डोक्यात घातली काचेची बाटली
''बाजूला व्हा मला जायचे आहे''... असे म्हटल्याचा राग आल्याने एका तरुणीने काचेची बाटली तरुणाच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. हा प्रकार हिंजवडी फेज - २ परिसरात शनिवारी (ता. २५) घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कल्याण भवरलाल सुतार (वय ३१, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली. आरोपी मोहिनी बसवराज गाडेकर उर्फ डॉली (वय २५ वर्षे, रा. म्हाळुंगे) यांनी सुतार यांच्या डोक्यात बाटली फेकून मारली.
फिर्यादी सुतार हे पहाटे पाचच्या सुमारास बी-१ लॉन्च, हिंजवडी फेज-२ येथील बाहेरील पार्किंगमध्ये थांबले होते. आरोपी तरुणी बाजूला थांबली होती. सुतार हे तिला म्हणाले की, ''बाजूला व्हा मला जायचे आहे.'' या बोलण्याचा राग आल्याने तरुणीने तेथे पडलेली काचेची बाटली फिर्यादी यांच्या डोक्यात मारली. त्या फुटलेल्या बाटलीचा तुकडा फिर्यादी यांच्या डाव्या गालास लागून दुखापत झाली आहे.
या प्रकरणी आरोपी तरुणीविरोधात रविवारी (ता. २६) हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ११८ (२) प्रमाणे, भारतीय दंड विधान कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 चाकणमध्ये हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून १६ वर्षीय मुलाला मारहाण
रस्त्यावर स्कूटीचा हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून १६ वर्षीय मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना चाकण परिसरात घडली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अर्जुन लक्ष्मण येरकर (वय २३, रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. २५) मेजवानी हॉटेल ते आयएआय कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. सचिन लक्ष्मण येरकर (वय १६) हा स्कूटीवरून जात असताना पुढे वाहने थांबलेली असल्याने त्याने हॉर्न वाजविला. याचा राग आल्याने वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा. चाकण) व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी सचिन याला हाताने, मनगटातील कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला, मानेला व पाठीला दुखापत झाली.
आरोपींविरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात रविवारी (ता. २६) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🔴 विहित वेळेनंतर बार सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापनांवर कारवाई
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बार आणि लॉज विहित वेळेपेक्षा जास्त वेळ विनापरवाना सुरु ठेवल्याप्रकरणी संबंधित बार व लॉजवर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने रविवारी (ता. २६) कारवाई केली आहे.
या कारवाईत ए - १ लॉज अँड बार आणि इको क्लब अँड बार, द सोशल स्ट्रीट या आस्थापनांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३३(क्ष) सह कलम १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आस्थापना विहित वेळेपेक्षा जास्त वेळेत (पहाटेच्या वेळी) विनापरवाना चालू ठेवून खाद्यपदार्थ व मद्य विक्री केली जात होती.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गणेश सावंत (ब.क्र. २६४३), विनोद वीर (ब.क्र. २९४७) आणि हर्षद कदम (ब.क्र. ३०३४) यांनी ही कारवाई केली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------