क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ६ ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ६ ऑगस्ट २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ६ ऑगस्ट २०२६ 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 ट्रान्सपोर्टच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 कंपनीचा माल सुरक्षितपणे पोहचवण्याचे आश्वासन देऊन कंपनीची १ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ब्रोकर आणि ट्रक चालकाविरुद्ध बुधवारी (ता. ५)  पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची ही घटना २३ जुलै २०२६ ते ५ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडली. काळभोरनगर, आकुर्डी येथील जीएसएम कार्गो अॅण्ड लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीला चाकण येथीस एल. के. मशीनरी इंडिया प्रा. लि. कंपनीचा ‘कोल्ड चेंबर डाई कास्टिंग मशीन’ हा माल  मार्स असोसिएट प्रा. लि. मानेसर (गुरुग्राम, हरियाणा) येथे पोहोच करण्याचे काम मिळाले होते.

कंपनीचे व्यवस्थापक अमरदीप श्रीसत्यनारायण तिवारी यांनी ब्रोकर मोहम्मद जुबेर (रा.  चाकण-शिक्रापूर रोड, मोहितेवाडी) याच्या माध्यमातून ट्रक उपलब्ध करून घेतला. यासाठी एक लाख रुपये भाडे ठरवण्यात आले होते. त्यानंतर ब्रोकर मोहम्मद जुबेर याने  बँक खात्यावर ७० हजार रुपये तर ट्रक चालक लुकमान याने मोबाईलवरील स्कॅनरद्वारे ८० हजार रुपये असे एकूण १ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे मशीन हरियाणातील संबंधित ठिकाणी पोहोच न करता माल अर्धवट सोडून दिला. 

या प्रकरणी आरोपी मोहम्मद जुबेर आणि ट्रक चालक लुकमान यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 कासारवाडीत जुन्या वादातून तरुणाला मारहाण दुचाकीची तोडफोड

 कासारवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रेहमान जब्बार सिद्दिकी (वय १९, रा. कासारवाडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री सुमारे ९ च्या सुमारास कासारवाडी स्मशानभूमीजवळील महादेव मंदिर ते कासारवाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. 

फिर्यादी रेहमान हे त्यांचा मित्र अभिषेक याच्यासोबत त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीवरून (क्र. एमएच १४ एलव्ही ६५७२) जात होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी मोहम्मद शेख, अमन बागवान आणि समीर (पूर्ण नाव माहीत नाही, तिघेही रा. कासारवाडी) यांनी त्यांचा रस्ता अडवला.

आरोपांनुसार, यावेळी मोहम्मद शेख याने शिवीगाळ केली, तर समीर याने अभिषेकच्या गालावर चापट मारली. त्यानंतर तिघांनी मिळून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीत अभिषेकच्या हाताच्या करंगळीला व डोक्याला दुखापत झाली. तसेच आरोपींनी दुचाकीची तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपींवर दापोडी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. ५) भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२),११८ (१), ३२४ (२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 पिंपरीत भाजी विक्रेत्यावर टोकदार वस्तूने हल्ला

 शेजारी भाजी विक्री करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका भाजी विक्रेत्यावर अनोळखी रिक्षाचालकाने टोकदार वस्तूने हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी (ता. ५) पिंपरी येथे घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अक्रम रफिक खान (वय २६, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास गणेश स्वीट दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर खान हे भाजी विक्री करत होते. त्यावेळी त्यांच्याशेजारी भाजी व्यवसाय करणाऱ्या एका रिक्षाचालकाशी वाद झाला.

फिर्यादीने संबंधित रिक्षाचालकाला शेजारी भाजी विक्री करू नको, असे ४ ऑगस्ट रोजी सांगितले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने टोकदार वस्तूने खान यांच्या मानेवर वार करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 मोशीत भरधाव दुचाकीची पादचारी महिलेला धडक महिला गंभीर जखमी

 रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली. हा अपघात बुधवारी (ता. ५) मोशी परिसरात घडला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात २१ वर्षीय दुचाकीचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चंदन रामनारायण सहानी (वय ३३, रा. बो-हाडेवस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता  जुन्या मोशी मार्केटकडून येणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी चंदन  सहानी यांच्या पत्नी किरण चंदन सहानी या रस्ता ओलांडत होत्या. तेव्हा दुचाकीस्वाराने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालवत किरण यांना जोरदार धडक दिली व त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. दुचाकीस्वार आरोपीचे नाव अभिषेक सुरेश देशमुख (वय २१, रा. बो-हाडेवाडी, मोशी) असे आहे. 

याप्रकरणी दुचाकीस्वारावर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 वडगाव घेनंद येथे ४७ लिटर गावठी दारूसह महिलेला अटक

वडगाव घेनंद येथील स्मशानभूमी रोड परिसरात बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेला चाकण दक्षिण पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून ४७ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून, त्याची किंमत ४ हजार ७०० रुपये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगाव घेनंद (ता. खेड) येथील स्मशानभूमी रोडवर करण्यात आली. आरोपी प्रियांका बिरेद्र राजपूत (रा. वडगाव घेनंद, ता. खेड) ही विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करताना आढळून आली.

या प्रकरणी दारूबंदी पथकातील पोलिस शिपाई नितीन पोपट पाटील (वय ३४, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेकडून जप्त केलेली दारू तिने मोनिका सेहवाग राजपूत (रा. वडगाव घेनंद, ता. खेड) यांच्याकडून आणल्याचे चौकशीत सांगितले.

आरोपी महिलेवर चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 बावधनमध्ये कोयता बाळगणारा तरुण ताब्यात

बावधन परिसरात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणावर बावधन पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०५ वाजण्याच्या सुमारास आण्णासाहेब बिल्डिंग, बावधन बुद्रुक येथे करण्यात आली.

याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप बबन भुंड (वय ३३, रा. आण्णासाहेब बिल्डिंग, बावधन, पुणे) याच्याकडे लोखंडी कोयता हे प्राणघातक हत्यार आढळून आले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १८ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रे, हत्यारे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३५(३) अन्वये नोटिस बजावण्यात आली आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🔴 निगडीत ५३० ग्रॅम गांजासह दोघांना अटक

निगडी परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. ५)  ए पत्राशेड, अजंठानगर, निगडी येथे करण्यात आली.

या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल विलास शिगवण (वय ३४) आणि प्रशांत रावसाहेब बनसोडे (वय २३, दोघेही रा. ए पत्राशेड, अजंठानगर, निगडी यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून ५३० ग्रॅम वजनाचा गांजा, १ हजार २०० रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल असा एकूण ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा गांजा विक्रीसाठी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आरोपींनी हा गांजा खेड शिवापूर येथील दर्ग्याच्या पुढील भागातील लिंबा बाळ्या नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी आरोपींवर निगडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (त्त) (अ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories