होंडा अमेझ कारची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीसह वडील जखमी

होंडा अमेझ कारची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीसह वडील जखमी

दिघी | २८ ऑक्टोबर २०२६ : पुणे-आळंदी रस्त्यावर होंडा अमेझ कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने आठ वर्षीय मुलगी आणि तिचे वडील जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात मुलीच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले असून, तिच्या छातीलाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिघीतील TCL कंपनीच्या जुन्या गेटच्या बाजूला, पीएलपीएल बसस्टॉपसमोर, पुणे-आळंदी रस्त्यावर घडली.

या प्रकरणी साजन रणसिंग बिडलानी (वय ४२ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. रोड क्रमांक ६, गणेश नगर, बोपखेल, दुर्गा माता मंदिराशेजारी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, साजन बिडलानी हे आपल्या दोन मुलींना घेऊन टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीवरून जात होते. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फळांच्या दुकानातून फळे खरेदी करण्यासाठी ते निघाले होते.

त्यावेळी त्यांच्या एमएच १४ एलआर ६१७३ क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एमएच ४६ एक्स ५५३३ क्रमांकाच्या होंडा अमेझ कारने धडक दिली.

कारचालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या धडकेत फिर्यादी आणि त्यांची आठ वर्षीय मुलगी भूमिका जखमी झाले. भूमिका हिच्या डोक्याला फ्रॅक्चर झाले असून, डाव्या छातीला दुखापत झाली आहे. तसेच साजन बिडलानी यांनाही मुका मार लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७७०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. संबंधित होंडा अमेझ कारचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२५(अ), १२५(ब), २८१, ३२४(४) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास  दिघी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories