पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी-दुचाकींसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक मिळवण्याची संधी
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी-दुचाकींसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक मिळवण्याची संधी
पिंपरी, ता. ६ ऑगस्ट २०२६ - पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. चारचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी विहित शुल्क (तीन पट) भरुन १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते २.३० या वेळेत तसेच दुचाकीसाठी ११ ऑगस्ट २०२६ रोजी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
विहित अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकित प्रत व आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. सदर डीडी DYR.T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेचा पुणे येथील असावा.
अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे छायाचित्र ओळखपत्र, केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ तसेच नियम ५ अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची (उदा. आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. चारचाकी वाहनांची यादी ११ ऑगस्ट व दुचाकीची यादी १२ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल.
यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी चारचाकी साठी ११ ऑगस्ट रोजी व दुचाकीसाठी १२ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विशिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.