'आपली पीएमपीएमएल' अॅपविषयी जागृती करण्यासाठी पीएमपी प्रशासनाचा विशेष कार्यक्रम
पुणे, ता. २७ - ऑनलाइन तिकीट विक्रीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) 'आपली पीएमपीएमएल' हे अॅप कार्यान्वित आहे. या अॅप्लिकेशनच्या वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी पीएमपी प्रशासन एप्रिलमध्ये जागृती कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये बसमध्ये व प्रमुख बस थांब्यांवर स्टिकर्स लावली जाणार आहेत.
'आपली पीएमपीएमएल' हे अॅपचे आतापर्यंत २४ लाख प्रवाशांनी मोबाईलमध्ये डाऊनलोड केले आहे. आता वापरकर्त्यांची संख्या ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. एप्रिलमध्ये जागृती कार्यक्रमात
प्रवाशांना अॅपविषयी माहिती देणे हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
'आपली पीएमपीएमएल' अॅप डाऊनलोड कसे करायचे, याबाबत माहिती देणारी स्टिकर्स शहरातील प्रमुख बसथांब्यांवर, बसमधील आसनव्यवस्था तसेच बसच्या दर्शनी भागावर लावली जाणार आहेत. या स्टिकर्सवर 'क्यूआर कोड' असेल व तो स्कॅन करताच प्रवाशांना थेट' आपली पीएमपीएमएल' अॅप डाऊनलोड करता येईल, असे प्रशासनाने सांगितले.
विशेष जागृती मोहिम
'' 'आपली पीएमपीएमएल' हे अॅप वापरकर्त्यांची संख्या वाढविण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. सध्या २४ लाख याचे वापरकर्ते आहेत, ती संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी या विशेष जागृती मोहिमेचे आयोजन केले आहे.'' - महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
'आपली पीएमपीएमएल' अॅपची वैशिष्ट्ये -
- बसची वाट पाहतानाच मोबाईलवर तिकीट काढता येईल.
- अॅपवर बसचे लोकेशन आणि वेळापत्रक पाहण्याची सुविधा.
- हवी ती बस कुठे आहे, हे समजते.