साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर
गुढीपाडवा व रामनवमीला मालमत्ता कर भरण्यासाठी कार्यालय राहणार खुले
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरु असून नागरिकांना अधिक सोयीस्कर पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असून या पार्श्वभूमीवर कर वसुलीला गती देण्यात येत आहे. या महिन्यात १९ मार्च रोजी गुढीपाडवा तसेच २६ मार्चला श्री राम नवमी या सार्वजनिक सुट्ट्या असून त्या दिवशीही सर्व विभागीय कर संकलन कार्यालये नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत सर्व कार्यालयांतील कॅश काऊंटर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत सुरू राहणार आहेत. यामुळे कामकाजाच्या दिवशी वेळ काढणे शक्य नसलेल्या नागरिकांनाही सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी १८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक.....
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता कर एकरक्कमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जात आहे. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ८०६ कोटी ७८ लाखांचा भरणा केला आहे. महापालिकेच्या अभय योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दि. १ मार्चपासून १४ मार्चपर्यंत १७ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच अभय योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत ५१ कोटी ११ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरणा झाला आहे. यात थकबाकीदारांना १३ कोटींची सवलत देण्यात आली आहे.
सुट्टीच्या दिवशीही करसंकलन कार्यालये सुरु राहतील
नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी अधिक सोयी उपलब्ध करुन देणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे. त्यानुसार साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुढीपाडवा व श्रीराम नवमीच्या दिवशीही नागरिकांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला मालमत्ता कर वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करावे.
- रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका
नागरीकांनी वेळेवर कर भरावा
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी कर संकलन विभागामार्फत विशेष नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना कर भरण्यासाठी अधिक वेळ व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कार्यालयात येऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून आपला थकीत तसेच चालू वर्षाचा मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा.
-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका