news
clock
पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित जमीन खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध

पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित जमीन खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध

पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित जमीन खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला नागरीकांचा तीव्र विरोध

प्रस्ताव तत्काळ रद्द करुन शाळा उभारण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अधिकाऱ्यांना निवेदन 

पिंपरी, ता. १३ - पुनावळे येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जमीन खासगी संस्थेला ३० वर्षांच्या दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिक, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने मुख्यमंत्री कार्यालय, महापालिका आयुक्त, महापौर तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाला सविस्तर निवेदन दिले आहे. सदर जमीन सुमारे ०.९१ हेक्टर (अंदाजे २ एकर ९९ गुंठे) आहे, या ठिकाणी महापालिकेने स्वतःच्या निधीतून आधुनिक माध्यमिक किंवा सीबीएसई शाळा उभारावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, पुनावळे येथील सर्वे क्रमांक ३८ पै. व ४४ पै. मधील ही जमीन विकास आराखड्यात (DP)स्पष्टपणे ‘माध्यमिक शाळा’म्हणून आरक्षित असून ती सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागेचा खासगीकरणाकडे कल जाणे हे नागरी हिताविरोधी आहे. सुमारे ७ कोटी रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात ही उच्च बाजारमूल्य असलेली जमीन ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला देणे हे आर्थिकदृष्ट्या चुकीचे व सार्वजनिक मालमत्तेच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. अशा निर्णयामुळे भविष्यात महापालिकेच्या उत्पन्नावर आणि शिक्षण धोरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुनावळे परिसरात वेगाने वाढणारी लोकसंख्या, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि शहरीकरण लक्षात घेता येथे शासकीय स्तरावर परवडणाऱ्या शिक्षणाची तीव्र गरज आहे. खासगी संस्थेद्वारे शाळा उभारल्यास शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून त्यामुळे सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येऊ शकते,

पुनावळे परिसरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि परवडणाऱ्या शिक्षणाचा हक्क लक्षात घेऊन महापालिकेने या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा,  निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखूनच पुढील पावले उचलावीत, असे निवेदनात स्पष्टपणे सांगितले आहे. 

सध्याच्या जमीन हस्तांतराच्या या संपूर्ण प्रस्तावाबाबत स्थानिक रहिवासी, गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा झालेली नाही. एवढ्या मोठ्या सार्वजनिक आरक्षणाच्या जागेचा निर्णय घेताना जनसहभाग व सार्वजनिक सुनावणी आवश्यक होती, मात्र ती प्रक्रिया राबविण्यात आली नाही, अशी नाराजी व तक्रार नागरीकांनी केली आहे. आता महापालिकेने वाकड येथे उभारलेल्या अत्याधुनिक सीबीएसई शाळेच्या धर्तीवर पुनावळे येथेही महापालिकेने स्वतःच्या निधीतून आधुनिक, दर्जेदार आणि सर्वसामान्यांना परवडणारी शाळा उभारावी, अशी एकमुखी मागणी केली आहे. 

अत्याधुनिक व परवडणारी सीबीएसई शाळा उभारणे अत्यावश्यक

“पुनावळेतील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली ही जमीन ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि ती थेट नागरिकांच्या भविष्यासाठी राखीव ठेवलेली आहे. अशा महत्त्वाच्या जागेचे खासगीकरण करुन ती अल्प मोबदल्यात दीर्घकालीन भाडेतत्त्वावर देणे हे पूर्णपणे चुकीचे व अन्यायकारक आहे. परिसरात वेगाने वाढणारी लोकसंख्या पाहता येथे महापालिकेने स्वतःच्या निधीतून अत्याधुनिक व परवडणारी सीबीएसई शाळा उभारणे अत्यावश्यक आहे. वाकड येथे जसा आदर्श निर्माण झाला आहे, तसाच पुनावळे येथेही निर्माण करावा, हीच आमची ठाम मागणी आहे.”

– सचिन लोंढे, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन



फेडरेशनच्या ठळक मागण्या - 

- पुनावळेतील शाळा आरक्षित जमीन खासगी संस्थेला देण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा.

- महापालिकेने स्वतःच्या निधीतून आधुनिक माध्यमिक किंवा सीबीएसई शाळा उभारावी.

- संपूर्ण निविदा प्रक्रिया, आर्थिक मूल्यांकन आणि निर्णयाची पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी.

- नागरिक, पालक व स्थानिक संस्थांसाठी तात्काळ सार्वजनिक सुनावणी (Public Hearing) आयोजित करावी.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories